नकारात्मक व्यक्ती जीवनात अयशस्वी होतात :– प्रा. इसाक मुजावर.
शिक्षकांचा व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर व्याख्यान घेण्यात आले...!
सोलापूर :– प्राथमिक शिक्षक हा राष्ट्र घडविणारा शिक्षक आहे. मला विजेते निर्माण करायचे आहेत. या ध्येयाने शिक्षकांनी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, कारण नकारात्मक व्यक्ती हे जीवनात अयशस्वी होतात. असे प्रतिपादन मोटीवेशनल स्पीकर व ऑर्किड इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्रा. इसाक मुजावर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने खाजगी शिक्षकांचे प्रेरणास्थान कै. चं. का. कोळशेट्टी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. इसाक मुजावर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
शिक्षकांचा व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर बोलताना ते म्हणाले की शिक्षकांच्या समर्पित भावनेमुळेच उद्याचा नागरिक घडत असतो, शिक्षकांना विविध भूमिका पार पाडता आल्या पाहिजेत. शिक्षकांनी समस्येचे भागीदार न होता उपाय शोधणारे झाले पाहिजेत, शिक्षकांची आदर्श परंपरा जोपासून विदयर्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रारंभी निर्मला कोळशेट्टी यांच्या हस्ते कै कोळशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, पुष्पा इनामदार यांनी ईशस्तवन सादर केले. शिक्षक महासंघाचे राज्यप्रवक्ता कृष्णा हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक महासंघाचे मुख्यसचिव कांता तुंगार यांनी कै. कोळशेट्टी यांनी शिक्षकांसाठी केलेले समर्पित कार्य व त्यांचे योगदान याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. अन्सार शेख यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संघटनमंत्री प्रकाश देशपांडे, कार्याध्यक्ष संतोष आयरे, यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व राज्यभरातून शिक्षक सहभागी होते.