सोलापूर दौऱ्यावर आलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला कोणते निर्देश दिले ते पहा…. (Revenue Minister Balasaheb Thorat and Yashomati Thakur on a visit to Solapur | See what instructions were given by them to the Solapur administration) – ANC News
COVID - १९ बातम्याआरोग्य व शिक्षणमाझं सोलापूर
Trending

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला कोणते निर्देश दिले ते पहा…. (Revenue Minister Balasaheb Thorat and Yashomati Thakur on a visit to Solapur | See what instructions were given by them to the Solapur administration)

ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश...!

सोलापूर, दि. ८ ऑगस्ट कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन, ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत श्री. थोरात बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

श्री. शिवशंकर यांनी शहरातील तर श्री. शंभरकर यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असली तर सर्व प्रकारच्या उपचारासाठीचे नियोजन केले असून, २३ हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. ५६ कोविड केअर सेंटरमध्ये ८७१५ ची क्षमता असून, २० डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १०४६, तर ११ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १०५८ रूग्णांची क्षमता आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणखी १२० बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.

श्री. थोरात म्हणाले की, ‘कोरोनाचे संकट ऐतिहासिक आहे. राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असले, तरी इतर शहरात संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहरात सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, जिल्हा प्रशासनाने रूग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. पुढील १०० दिवसांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे’.

जिल्हा प्रशासन विविध पातळीवर मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. बाहेर गावी जाणे, लग्नसमारंभ, भाजी बाजार, वाढदिवस, अंत्यविधी, याठिकाणी होणारी गर्दी टाळा. दंड, लॉकडाऊन कोरोनावर उपाय नाही, प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. स्वनियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात साबणाने स्वच्छ धुण्यावर भर दिला तर रूग्णसंख्या आटोक्यात येणार आहे, असेही श्री. थोरात यांनी सांगितले.

महिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे- ॲड. यशोमती ठाकूर

पुरूष मोठ्या प्रमाणात कामानिमित्त बाहेर जातात. त्यांना संसर्ग झाल्यास घरातील इतरांनाही बाधा होते. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना ॲड. ठाकूर यांनी केल्या. विडी कामगार महिलांच्या कामे करून, आधारकार्डसाठी त्यांच्या बोटाचे ठसे येत नाहीत. त्यांच्या बायोमेट्रीकच्याही तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांनी पॉस्को, घरगुती हिंसा केसेसबाबत माहिती घेतली. अंगणवाडीसेविका मानधन वाढविणे आणि त्यांना एक तारखेला पगार करणे याबाबतीत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी पॉस्को आणि घरगुती हिंसाच्या केसेसमध्ये घट झाल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले तर विडी कामगार महिलांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी माहिती दिली.

श्री. भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात १०हजार २०९ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यापैकी ५१७ मयत झाले असून ६६७५ रूग्ण बरे होऊन घरी गेले तर ३०१७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला सर्व बाबतीत नागरिकांचे सहकार्य मिळत असून कोविड हॉस्पिटल, आरोग्यातील रिक्त पदे, औषधे, ॲम्ब्यूलन्ससाठी सहकार्य करण्याची अपेक्षा श्री. थोरात यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, सहायक अधिष्ठाता डॉ. श्रीमती जयस्वाल, अग्रजा वनेरकर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. मंजिरी कुलकर्णी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, स्नेहल भोसले, मोहिनी चव्हाण, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: