कोरोना महायोध्दा पुरस्काराने दत्तात्रय पुजारी सन्मानित
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांना पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना महायोध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या सन्मानाचे वितरण सचिव डॉ. आशिषकुमार सुना व जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी केंगार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार विलास काळे, बाबासो काशिद, प्रकाश पारसे यांच्यासह पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दत्तात्रय पुजारी यांनी गेल्या तीन वर्षापासून मंगळवेढा तालुक्यात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य करीत आहेत, त्यांनी नंदेश्वर बिट, बोराळे बिट मध्ये धडाकेबाज कामगिरी केली, बोराळे बिट मध्ये अनेक अवैद्य धंदे असतानाही त्यांनी या बिटमध्ये सिंघमगीरी कामगीरी बजाविली आहे.
गेल्या चार महिन्यापासून कोरोना महामारीने सर्वत्र धुमाकूळ माजविला, अशा परस्थितीत दामाजीच्या नगरीत अद्यापतरी कोरोनाचा शिरकाव झाला नाही, यामध्ये मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातही पोलिस विभागाच्या माध्यमातून कोरोना विरोधी बंदोबस्त मोहिमेत पुजारी यांचे कार्य मोलाचे ठरले.
लॉकडाऊनमध्ये कर्नाटक व महाराष्ट्र सिमेवर कात्राळ येथे त्यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे तब्बल तीन महिने तालुक्यात कोणत्याही मार्गाने जनतेची वर्दळ होवू दिली नाही, या सर्व कामगीरीची दखल घेवून पत्रकार सुरक्षा समितीने कोरोना महायोध्दाचा पुरस्कार देवून आज त्यांचा फेटा बांधून, सन्मानपत्र देवून पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकार्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कोरोनाच्या लढाईत मंगळवेढयाच्या पत्रकार बंधूनी, पदाधिकार्यांनी, सर्व विभागाच्या अधिकार्यांनी पोलिस खात्याला मोलाचे सहकार्य केले, यामुळे आपली दामाजी नगरी आजही कोरोनापासून चार हात दूर आहे,यापुढील काळात ही सर्व जनतेनी पोलिस खात्याला सहकार्य करावे, व कोरोना महामारीपासून तालुक्याला वाचविण्याचा प्रयत्न करूया असे मत दत्तात्रय पुजारी यांनी बोलताना व्यक्त केले.