विषाणू प्रसाराला रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख – ANC News
माझं सोलापूर
Trending

विषाणू प्रसाराला रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतली आढावा बैठक

सोलापूर, दि. 14: सोलापूर शहरातील कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय पथक पाठविण्याचा विचार करु. सोलापुरातील कोरोना विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी अधिक खबरदारी  घेण्याची आवश्यकता आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

कोविड-19 विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस आमदार प्रणितीताई शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री देशमुख यांनी सांगितले की,

सोलापुरातील कोरोना प्रसार शहराच्या ठराविक भागात आहे. त्या भागात आणि मुंबईच्या धारावी परिसरात काहीअंशी साम्य आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या त्याचा अभ्यास करुन त्याप्रमाणे उपाययोजना सोलापुरात राबवाव्यात.

प्रसार वाढणार नाही यासाठी फिल्डवर आणि बाधित व्यक्तींवर रुग्णालयात उपचार अशा दोन आघाड्यांवर कोविड-19 विरुध्दची लढाई लढायची आहे. शहरात आणि ग्रामीण भागात दर 15 दिवसांनी तपासणी करायला हवी. विशेषकरून वयस्कर आणि मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग अशा आजार असणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवायला हवे, असे त्यांनी सांगितले.

सोलापूरसाठी तज्ञ डॉक्टरांचे एक पथक पाठविण्याचा विचार केला जाईल. खासगी दवाखान्यात कोरोना उपचार घेतलेल्या रुग्णांना शासकीय दरानुसार पैसे आकारले जावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूरसाठी स्वतंत्र पथकांची मागणी केली होती.

आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगार, यंत्रमाग कामगार यांच्या उपचारासाठी स्वतंत्र उपाययोजना करायला हव्यात, असे सांगितले.

            सिव्हील हॉस्पिटलमधील बी ब्लॉकमध्ये एका मजल्यावर कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली. यावर विचार केला जाईल, असे श्री देशमुख यांनी सांगितले.

 या वेळी वैशंपायन स्मृती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, महापालिकेच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

 • शासकीय रूग्णालयात खाटांची संख्या पुरेशी, आणखी वाढविण्यावर भर.
 • प्रोटेक्टीव्ह केअर, मास्क, सॅनिटायझरचा साठा मुबलक.
 • कोविड रूग्णांसाठी खाजगी दवाखान्यांचे दर शासनाकडून निर्धारित.
 • महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत  स्पष्टता आणणार.
 • खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांवर आर्थिक ताण पडणार नाही, याची खबरदारी.
 • राज्यात तपासणी लॅबची संख्या वाढविली, पुढच्या आठवड्यात 100 व्या लॅबचे लोकार्पण.
 • जागतिक आपत्तीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे उपाययोजना.
 • जिल्हा प्रशासनाला सहाय करण्यासाठी विशेषज्ञांची टीम.
 • विडी कामगारांसाठी वेगळ्या उपाययोजना.
 • खाजगी आणि शासकीय रूग्णालये भागीदारी स्विकारून काम करतील.
 • प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्लाझमा थेरपीची सोय.
 • वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच परीक्षा घेणार.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: